पुणे : खडकी येथे अनैतिक प्रेमसंबंधातून ३ वर्षाच्या चिमुकलीचा आई आणि तिच्या प्रियकराने गळा आवळून खुन केल्याचा उलघडा करण्यास गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाला यश आले असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
संतोष देवमन जामनिक (वय २५) आणि लक्ष्मी संतोष गवई (वय २६, दोघे रा. खेरपुडी, ता. बाळापूर, जि. आकोला) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी रेल्वे स्टेशन ते खडकी बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील सीएफडी मैदानाजवळ तीन वर्षाच्या चिमुकलीचा गुरुवारी (ता.२ मार्च) दुपारच्या सुमारास मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात चिमुकलीचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर खडकी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास खडकी पोलिस व गुन्हे शाखा संमातर तपास करीत होते.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांना ३ वर्षाच्या या मुलीची ओळखही पटत नव्हती. पोलीस तपास करीत असताना घटनेपासून काही अंतरावर पुणे-मुंबई महामार्गावरील एका दुकानातील सीसीटीव्हीमध्ये एक जोडपे पोलिसांना दिसून आले. त्यातील महिलेच्या कडेवर मुलगी होती. या सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेत़ पोलीस खडकी स्टेशनपर्यंत पोहचले. खडकी रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडताना हेच जोडपे आढळून आले. त्यात बाईच्या कडेवरील मुलीचे पाय सरळ होते. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला.
पोलीस शोध घेताना ते आरोपी अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, हे दोघे बाळापूर गावात नसून दोघेही पुण्यात असण्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोघांना रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, ते दोघे गावातून पुण्याला १ मार्चला पळून निघाले होते. त्यावेळी लक्ष्मी हिने आपल्याबरोबर लहान मुलीला घेतले होते. त्यावरुन रेल्वे प्रवासात दोघांमध्ये भांडणे झाली. या भांडणातून आरोपी संतोष जामनिक याने मुलीला पट्ट्याने मारहाण केली. आणि तिचा गळा आवळला. त्यातच चिमुकलीचा मृत्यु झाला.
त्यानंतर दोघेही खडकी रेल्वे स्टेशनला उतरले. आणि मोकळ्या मैदानात मुलीचा मृतदेह टाकून ते पळून गेले होते. अशी पोलिसांना दोन्ही आरोपींनी कबुली दिली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उपायुक्त अमोल झेंडे , सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र पवार, हरीश मोरे, अजय गायकवाड, संजय आढारी, प्रवीण भालचिम, विठ्ठल वाव्हळ, सारस साळवी, नागेशसिंग कुवर, विनोद महाजन, स्वप्निल कांबळे, अशोक शेलार, मनोज सांगळे, शितल शिंदे, वैशाली माकडी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.