हडपसर : हडपसर येथून दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या तरुणाचा बोपदेव घाटात गोळी झाडून झालेल्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ च्या पथकाने चार आरोपींना ठोकल्या बेड्या आहेत.
योगेश सुभाष भिलारे (२४), रोहन राजेंद्र गायकवाड (वय २३) व अक्षय संदीप गंगावणे (२१) व चेतन परमेश्वर कुदळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर गणेश नाना मुळे (वय २१, रा. सातववाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणेशचे वडील नाना तात्याराम मुळे (वय-४५, धंदा ड्रायव्हर. रा.स.नं.१९६ संकेत विहार लेन नं.१२ निअर रेल्वे बिल्डींग फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नाना मुळे यांचा मुलगा गणेश याला त्याचे मित्र संशयित चारही आरोपी हे रविवारी (ता.११ डिसेंबर) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जेवण करण्यासाठी घेऊन गेले होते. त्यानंतर वरील चारही संशयितांनी गणेशला अज्ञात कारणासाठी बंदुकीतून गोळी झाडुन खुन केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्याचा मृतदेह बोपदेव घाटामध्ये फेकुन दिली, असा संशय फिर्यादी नाना मुळे यांना आला होता. याप्रकरणी नाना मुळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ च्या पथकाने चारही आरोपींना ताब्यात घेरून अधिक चौकशी केली असता, आरोपींनी गणेशला चुकून गोळी लागली असून यात त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच त्याचा मृतदेह बोपदेव घाटात फेकला आहे. अशी कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. मात्र नेमका खून कोणत्या कारणावरून व कशामुळे झाला हे समजू शकलेले नाही. ते तपासात निष्पन्न होईल. अशी माहिती युनिट पाचचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली.
हि कामगिरी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त नारायण क्षिरसागर, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चैताली गपाट, पोलीस हवालदार प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, राहुल ढमढेरे व रमेश साबळे यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.