शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण चौकात मागील ५ दिवसापूर्वी मंगळवारी (ता. ३१ जानेवारी) फायरींग करून फरार झालेल्या अनोळखी आरोपीस शिक्रापूर पोलीसांनी अवघ्या ४८ तासाच्या आत अटक केली आहे.
ज्ञानदेव नामदेव कोहकडे (सध्या रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, मुळ रा. नाव्हरा ता. शिरूर, जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रोहन राकेश पाठक (वय २३ , रा. शिक्रापूर पाटवस्ती, ता. शिरूर, जि.पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन पाठक व त्यांचा मित्र अजय रामराव चव्हाण (रा. करंदीनगर शिक्रापूर) शिक्रापूर येथील चाकण चौक येथे रस्त्याच्या कडेला थांबलेले असतांना, एका अनोळखी इसम मोटारसायकलवरून त्यांच्याजवळ आला आणि कारण नसताना आरोपीने मोटारसायकलची लाईट डोळयावर मारली. याबाबत विचारणा केली असता, आरोपीने रोहन व अजय यांना शिवीगाळ दमदाटी करून कंबरेचा बंदूक काढुन गोळीबार केला व पुन्हा पिस्टल जीवे मारणेच्या उद्देशाने रोहन यांच्या कपाळावर रोखुन धरला होता. याप्रकरणी रोहन पाठक यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आरोपीला पकडण्यासाठी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. सदर पथक गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच एका खबऱ्याकडून माहिती आरोपी ज्ञानदेव कोहकडे याने सदर गुन्हा केला आहे.
त्यानंतर पोलिसांनी आरोपी ज्ञानदेव कोहकडे याला ४८ तासाच्या आत अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्हयात वापरलेले पिस्टल व सहा जीवंत राउंड तसेच एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. तसेच गुन्हयाच्या ठिकाणावरून एक गोळीची पुंगळी पोलिसांना मिळाली होती. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर व पोलस नाईक अतुल पखाले करीत आहेत.
दरम्यान, आरोपी ज्ञानदेव कोहकडे याला ताब्यात घेऊन अधीक चौकशी केली असता, आरोपी हा पुर्वी रांजणगाव एमआयडीसीमध्ये माथाडी कामगार म्हणून काम करीत होता. तसेच सध्या तो महाराष्ट्र राज्य श्रमीक माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियन या संघटनेचा महाराष्ट्र राज्य कमिटी अध्यक्ष म्हणून काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश चट्टे, शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिकापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर सहा पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, रणजित पठारे, सहा फौज पानसरे, पोलीस हवालदार होणमाने, अमोल दांडगे, सचिन होळकर, चंद्रकांत काळे, पोलीस नाईक चितारे, विकास पाटील, पो. कॉ. देवकर, किशोर शिवनकर, निखिल रावडे आणि लखन शिरसकर यांच्या पथकाने केली आहे.