दिनेश सोनवणे
दौंड : दौंड शहरात बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या मटक्यावर दौंड पोलिसांनी धाड टाकून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठच दिवसांपूर्वी “पुणे प्राईम न्युज” ने दौंड शहरात अवैध धंदे खुले आम सुरू असून या बाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी लक्ष द्यावे या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करत वास्तव समोर मांडले होते. त्यानुसार दौंड पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.
अशोक रामा गुप्ते (रा. इंदिरानगर, दौंड, ता. दौंड), अशोक सर्जेराव चव्हाण रा. भीमनगर, दौंड ता. दौंड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी रवींद्र तात्याबा काळे (वय-३०, धंदा नोकरी पोलीस कॉन्स्टेबल) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड शहरातील दौंड सिद्धटेक रोड लगत असणारे दुर्गा माता मंदिराच्या पाठीमागे काहीजण मटका घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी २ हजार २४० रुपये रोख रक्कम व स्लिप बुक पेन असा मुद्देमाल जप्त केला. आरोपी कल्याण मटका नावाचे जुगार खेळ खेळत असताना जागीच मिळून आल्याने गुन्हा दाखल केला आहे.
मुख्य सूत्रधार मात्र मोकाट..!
दरम्यान, दौंड पोलीसांनी ही जरी कारवाई केली असली, तरी या मटक्या मागील खरे सूत्रधार अद्याप मोकाट असून दौंड पोलीस यांना कधी अटक करणार असा प्रश्न शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत. दौंड पोलीस स्टेशन परिसर, शालिमार चौक, महात्मा गांधी चौक, गोपाळवाडी रोड, सहकार चौक, रेल्वे स्टेशन परिसर, कुरकुंभ मोरी परिसर, या परिसरात अवैध रित्या मटका, तसेच पत्त्यांचे क्लब चालू आहेत. या ठिकाणी मात्र पोलीसांनी कारवाई करणे टाळले असल्याचे नागरिक बोलत आहेत.