पुणे : नसरापूर (ता.भोर) येथील टेम्पो चालकाला मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्हयातील चोरी केलेला टेम्पो व मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दत्ता नामदेव कांबळे (वय-३८, रा. भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुजराम करणराम पुरोहित (वय-३०, रा नसरापूर ता भोर जि पुणे) यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुजराम पुरोहित हे टेम्पो घेउन वेळू भागात २३ डिसेंबरला थांबले होते. त्यावेळी एक अनोळखी इसम पुरोहित यांच्याकडे आला आणि म्हणाला कि, नसरापूर येथुन काही लेबर आणायचे असून ते रांजे (ता.भोर) येथे सोडायचे आहे. अशी खोटी बतावणी केली. त्यानंतर आरोपीने आणखीन एका साथीदाराला बोलाविले व तिघेजण टेम्पोत बसून गेले.
दरम्यान, काही अंतर पुढे गेल्यानंतर आरोपींनी टेम्पो चालक पुरोहित यांना टेम्पो बाजूला घेण्यास सांगितले व आरोपींनी पुरोहित यांच्या गळ्याला ब्लेड लावून मारहाण केली व जबरदस्तीने पुरोहित यांच्या ताब्यातील टेम्पो, मोबाईल व रोख रक्कम जबरीने चोरून घेऊन पसार झाले.
याप्रकरणी सुजराम पुरोहित यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील गुन्ह्याचा समांतर दिशेने तपास करीत असताना, पथकाला सदर गुन्हा हा भोसरी येथील आरोपी दत्ता कांबळे यांनी केला असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी कांबळेला सापळा रचून ताब्यात घेतेले. आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून गुन्हयातील चोरी केलेला टेम्पो, व मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी राजगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार अजित भुजबळ, राजू मोमीन, अमोल शेडगे, धिरज जाधव आणि दगडू विरकर यांच्या पथकाने केली आहे.