पुणे : आरोग्य सल्लागार असलेल्या महिलेवर पाळत ठेवुन तिची गुप्त माहिती काढणाऱ्या दोन गुप्तहेरांना गुन्हे शाखा २ च्या पथकाने कोरेगाव पार्क परिसरातून बेड्या ठोकल्या.
निलेश लक्ष्मणसिंग परदेशी (२५, रा. वडगाव मावळ,पुणे) आणि राहुल गुणवंतराव बिरादार (३०, रा देहुगाव ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत कोरेगाव पार्क परिसरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही आरोग्य सल्लागार आहे. तिचे परदेशात शिक्षण झाले असून ती सध्या पुण्यात असते. महिला कामानिमित्त घरातुन बाहेर पडल्यानंतर ती ज्या ठिकाणी जाईल तिथे सतत तिचा कोणीतरी पाठलाग करत असल्याचे व तिचे फोटो काढत असल्याची तक्रार महिलेनी भरोसा सेलच्या महिला कक्षाला ४ जानेवारी रोजी दिली होती.
परंतु, ७ जानेवारी रोजी महिला पुन्हा भरोसाकडे आली. तिचा कोणीतरी पाठलाग करत असल्याचे तिने सांगितल्यानंतर स्वतः सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावर यांनी हे प्रकरण हातात घेतले. यावेळी त्यांनी एक पथक तयार करून त्या पथकाला फिर्यादीच्या पाठोपाठ जाण्यास सांगितले.
७ जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास महिला आपल्या सहकाऱ्याबरोबर कोरेगाव पार्क येथील ६ नंबर गल्लीत आल्या. त्यावेळी दोन जण तिचे चोरून फोटो काढत असल्याचे दिसून आले.
त्यानंतर सापळा रचलेल्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी त्यांची नावे सांगितली. ते डिटेक्टीव्ह म्हणून नोकरी करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मोबाईलची पाहणी केली असता त्यांच्या मोबाईलमध्ये महिलेसंबंधित फोटो आणि माहिती गुन्हे शाखेला मिळाली. दोघांवर विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शंकर पाटील, सहायक पोलिस फौजदार जगन्नाथ भोसले, अंमलदार राहुल होळकर, पुजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.