पुणे : ‘तु मला भाई म्हणत नाही, तुला मस्ती आली का’ असे म्हणत एका तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून ब्लेडने त्याच्या गळ्यावर सपासप वार केल्याची घटना हडपसर परिसरातील हिंगणेमळा येथे घडली आहे. ही घटना मंगळवारी ( ता.१३) रात्री साडेसातच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
सोन्या उर्फ विनोद बंडु कांबळे (वय-23 रा म्हाडा वसाहत, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर, याप्रकरणी सागर राजेंद्र गुप्ता (वय-26 रा. जुनी म्हाडा कॉलनी, हिंगणेमळा, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मंगळवारी (ता.१३ ) रात्री फिर्य़ादी हे लहु गर्जना ग्रुप चौकात मोबाईलवर बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी आणि त्याचे मित्र अजय पाडुळे व अक्षय पाडुळे हे फिर्यादी जवळ आले. कांबळे याने त्याच्या जवळील कोयता काढून फिर्यादी यांच्या अंगावर धाऊन गेला. आणि ‘तु मला भाई म्हणत नाही, तुला मस्ती आली आहे का’असे म्हणत हातातील ब्लेडने फिर्य़ादी यांच्या गळ्यावर वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, जखमी सागर गुप्ता याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सोन्या उर्फ विनोद बंडु कांबळे याच्यावर आयपीसी ३०७ , ५०४ , ५०६ आर्म अॅक्ट महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.