पुणे : फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेड लाइट एरिया मधून सहा महिन्यात १७ दुचाकी चोरलेल्या आरोपीला फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी सोहेल युनूस शेख (वय-२६, रा. पारसी चाळ, देहूरोड) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून १७ दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.
फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेड लाइट एरिया मधून मागील सहा महिन्याच्या कालवधीत १७ दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार घडलेल्या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी २०० व त्यापेक्षा जास्त सीसीटीव्हीची पाहणी केली असता एक संशयीत इसम दाणे आळी येथे गाडी घेऊन जाताना दिसला.
त्यानुसार पोलिसांनी सोहेल शेख याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे असलेल्या गाडीबाबत अधिक माहिती घेत असताना सदर दुचाकी चोरी झाल्याची नोंद फरासखाना पोलीस ठाण्यात होती. संशय पक्का झाल्याने तपास अधिकारी पोलीस ना. वैभव स्वामी, पोलीस ना. प्रवीण पासलकर, पोलीस ना. सुमित खुट्टे यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली असता त्याने गाडी चोरी केल्याची कबुली दिली.
दरम्यान, त्याच्याकडे अधिक तपास केला असता रेड लाइट एरिया मध्ये फिरण्यासाठी रात्री फेर फटका मारायचा आणि गाड्यांवर नजर ठेवून मास्टर किल्लीने गाडी चालू करून तिथून पसार होत असायचा. अशा एकूण रेड लाईट एरिया मधून त्याने तब्बल १७ गाड्या चोरल्या होत्या आणि एक बाहेरून चोरली होती. या सगळ्या गाड्या त्याने देहू रोड येथे पार्क केल्या होत्या. या सगळ्या गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद करत आहे.