पुणे : Pune Honey trap – महिलांकडून तसेच तरुणींकडून बड्या उद्योगपती पासून ते राजकारण्यांपर्यंत हनी ट्रॅप (Pune Honey trap) प्रकरणात अडकवून त्यांच्याकडून पैसे लाटण्याचे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार पुण्यात घडला असल्याचे समोर आले आहे. बिझनेस डिल करायची आहे, असे सांगून एका तरुणीने व्यावसायिकाला फ्लॅटवर नेऊन त्यांच्या सोबत फोटो काढले. त्यानंतर त्या व्यावसायिकाला बलात्काराची केस करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून १७ लाख ५० हजार रुपये लुबाडणार्या वकिलाला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Honey trap)
विक्रम भाटे (वय ३५, रा. हडपसर ) अशी अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. तर वाघोलीतील २५ वर्षिय तरुणी निधी दीक्षित हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मगरपट्टा सिटी येथील एका ४२ वर्षाच्या व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार सिजन मॉल, निधी दीक्षित हिच्या घरी आणि विक्रम भाटी याच्या कार्यालयात ३ ऑगस्ट २०२२ पासून आतापर्यंत सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. ते ३ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांचा मित्र व त्याची मैत्रिण यांच्याबरोबर सिजन मॉल येथील प्लॉयहाय रेस्टारंटमध्ये गेले होते. त्यांच्या टेबलवर एक मुलगी आली. तिने लायटर मागण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी ओळख करुन घेतली. आपले नाव निधी दीक्षित असून मुंबईहून पुण्यात आले असून बिझनेस करण्यासाठी तुमची मदत लागेल, असे सांगून त्यांचा मोबाईल नंबर घेतला.
त्यानंतर तिने व्हॉटसअॅप कॉलवर फिर्यादी यांच्याशी बोलणे सुरु केले. ७ नोव्हेबर रोजी तिने बिझनेसबाबत बोलायचे आहे, असे म्हणून तिच्या वाघोलीतील फ्लॅटवर नेले. तेथे ती बेडरुममध्ये गेली व पारदर्शक नाईट ड्रेस घालून बाहेर आली. फिर्यादी यांच्या शेजारी बसून तिने ४-५ क्लोज सेल्फी काढले. त्यानंतर ती परत बेडरुममध्ये गेली. ड्रेस बदलून बाहेर आली व फिर्यादी यांना तू येथे कशाला आलास, येथे काय काम आहे तुझे, येथून चालता हो, असे बोलली. तिच्या स्वभावात अचानक झालेला बदल पाहून फिर्यादी घाबरुन तेथून निघून आले व त्यांनी तिचा मोबाईल ब्लॉक केला.
त्यानंतर १५ नोव्हेबर रोजी निशा गुप्ता हिच्या फोनवरुन तिचा वकील विक्रम भाटे याने फोन केला. निधी दीक्षित यांनी तुमच्यावर अशी तक्रार केली आहे की त्यामध्ये तुम्हाला बेल मिळणार नाही.
हे प्रकरण मिटवायचे असेल तर मला सांगा मी तुम्हाला मदत करतो. तुमची केस मिटवून टाकतो. फिर्यादी यांनी घाबरुन मदत करा, असे सांगितले. तेव्हा विक्रम याने ८ लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा त्यांनी इतके पैसे आता नाहीत, असे सांगून गळ्यातील सोन्याची चैन, लॉकेट असे ६ तोळ्याचे सोने निशा गुप्ता हिच्याकडे देऊन मुथूट फायनान्समध्ये (Muthoot Finance) तारण ठेवून विक्रम भाटे याला पैसे दे असे सांगितले. त्यानंतर १६ नोव्हेबरला निशा गुप्ता हिने १ लाख ६० हजार रुपये विक्रम भाटे याला दिले.
त्यानंतर विक्रम भाटे याने वेळोवेळी त्यांना धमकावून अगदी सर्वाच्च न्यायालयातही जामीन मिळणार नाही असे सांगून त्यांना लुबाडत राहिला. त्यानंतर निशा हिने फिर्यादी यांना सांगितले की, विक्रम भाटे, निधी दीक्षित, वैभव शिंदे हे लोकांना जाळ्यात फसवून त्यांच्याकडून पैसे काढतात. तुलाही फसवून पैसे काढण्याकरीता सांगितले होते. परंतु फिर्यादी हा माझा चांगला मित्र आहे मी तसे काही करणार नाही, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांच्या हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी विक्रम भाटे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करीत आहेत.