पुणे : मी पोलीस आहे, मला हप्ता का देत नाही, असे म्हणून लोहगाव येथील पेट्रोलपंप चालकाकडे ५ लाखाची खंडणी मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदिप रावसाहेब मोटे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी काळुराम दत्तात्रय खांदवे (वय-३५ रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.५) तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार काळुराम खांदवे यांचा लोहगाव येथे जगद्गुरु पेट्रोल पंप आहे. तर आरोपी प्रदिप मोटे हे पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. आरोपी प्रदिप मोटे यांनी १८ सप्टेंबर २०२२ ला सकाळी दहाच्या सुमारास खांदवे यांच्या पंपावर आले. तेव्हा खांदवे आणि त्यांचा भाऊ तुकाराम खांदवे होते. त्यावेळी आरोपी प्रदिप मोटे याने तक्रारदार यांना म्हणाले कि, तुमचा पंप चांगला चालतो, तुम्हाला कोणी त्रास देऊ नये, यासाठी ५ लाख रुपये हप्ता मागितला.
त्यानंतर आरोपी प्रदिप मोटे यांनी खांडवे यांच्याकडे ५ लाख रुपये हप्ता मागून दिला नाही तर बघून घेण्याची धमकी दिली. आरोपी मोटे हे एवढ्यावरच थांबले नाही तर त्याने पाच लाख रुपयांची खंडणी मागून फिर्यादी यांना काठीने आणि पाईपने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या खांडवे यांनी याबाबत तक्रार अर्ज केला होता.
दरम्यान, विमानतळ पोलिसांनी खांडवे यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करुन प्रदिप मोटे याच्याविरुद्ध आयपीसी 387, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केला आहे. तरी, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लहाणे करीत आहेत.