पुणे : बस थांब्यावर उभी करण्यात आलेली बस हलवावी या कारणावरुन शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या वाहतूक पोलिसांनी पीएमपीएमएल बस चालक व वाहक यांना पोलीस ठाण्यात नेऊन मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (ता.२९) सायंकाळी शिक्रापूर येथे घडली आहे. रिक्षा चालकांच्या सांगण्यावरून पोलिसाने मारहाण केल्याचा आरोप चालकाने केला आहे.
रमजान हुसेन पठाण (वय-35 रा. वाघोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २९) रोजी पठाण हे वाघोली-कारेगाव ही बस घेऊन निघाले होते. शिक्रापूर बस थांब्यावर बस थांबवल्यानंतर प्रवासी चढले व उतरले. त्यावेळी त्या ठिकाणी रिक्षा उभ्या होत्या. रिक्षा चालकांनी पठाण यांना बस हलवण्यास सांगितले. यानंतर पठाण यांनी बस पुढे घेतली. बस थांबा आहे वेळ झाल्यावर निघेल असे पठाण यांनी सांगितले. त्यावेळी चालक आणि रिक्षा चालकांमध्ये वाद झाला. त्यांनी वाहतूक पोलिसांना बोलावून घेतले.
दरम्यान, वाहतूक पोलिसाने रिक्षा चालकांची बाजू घेत बस चालकाला बस हलवण्यास सांगितले. मात्र, चालकाने वेळ झाल्यावर बस निघेल असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चालक व वाहक यांना पोलीस ठाण्यात नेऊन मारहाण केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.