पुणे : पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तक्रारी अर्जावरून आरोपी न करण्यासाठी तसेच सदरील अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच स्विकारताना पिंपरी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकावर पुणे अॅन्टी करप्शन विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस उपनिरीक्षक रोहित गणेश डोळस (वय – ३१) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलिस ठाण्यात एक तक्रारी अर्ज दाखल आहे. त्या अर्जावरून अॅन्टी करप्शनकडे तक्रार देणार्याच्या मावस भावास आरोपी न करण्यासाठी तसेच पिंपरी पोलिस ठाण्यात प्राप्त झालेला अर्ज हा दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी सुरूवातीला पोलिस उपनिरीक्षक डोळस यांनी ३ लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २ लाख रूपयांची मागणी केली.
दरम्यान, तक्रारदार यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार तडजोडी अंती तक्रारदार व रोहित डोळस हे लाचेची मागणी करीत असल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी (ता. ३०) रंगेहाथ पकडले. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत साळुंखे, संदीप वर्हाडे, पोलिस हवालदार मुकुंद अयाचीत, पोलिस कर्मचारी भूषण ठाकूर आणि चालक एएसआय जाधव यांनी पडताळणी करून गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास एसीबी पुणेचे अधिकारी करीत आहेत.