Pimpari News : पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात विनापरवाना वृक्षतोडीच्या घटना सातत्याने घडत आहेत. वृक्षतोडीमुळे होणारी निसर्गाची हानी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक अभिनव निर्णय घेतला आहे. महापालिकेकडून उद्यान विभागाची चार पथके नेमण्यात येणार असून, या पथकांमुळे वृक्षतोडीला चाप बसणार आहे.
वृक्षतोडीला चाप बसणार
दरम्यान, भोसरी एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीतील आठ झाडे; तसेच संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनसमोरील पदपथावरील वृक्षांच्या फांद्या तोडण्याची परवानगी संबंधितांकडून घेण्यात आली होती. मात्र, त्याऐवजी वृक्ष तोड करून फसवणूक करण्यात आली. असे प्रकार परिसरात सातत्याने घडत आहेत. यावर आळा घालण्यासाठी चार पथके नेमण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात येत आहे. Pimpari News
शहराच्या विविध भागांत बांधकाम, जाहिरात फलकांसाठी झाडे तोडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. खासगी जागेसह महापालिकेची झाडेही विनापरवाना तोडली जात आहेत. वृक्षतोडीच्या घटना रोखण्यासाठी उद्यान विभागाची चार स्वतंत्र पथके तयार करण्यात येणार आहेत.
या पथकांना कार्यपद्धती ठरवून देण्यात आली आहे. ही पथके आपापल्या भागाची पाहणी करणार आहेत. वृक्षतोडीचे प्रकार आढळल्यास संबंधितांवर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सारथी हेल्पलाइनप्रमाणे स्वतंत्र क्रमांक जाहीर करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले. Pimpari News