पिंपरी, (पुणे) : शिक्षिका असलेल्या महिलेने इंजिनियर पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भोईरवाडी, माणगाव येथे घडली. या महिलेने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन स्वतःचे जीवन संपवले. या घटनेने पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पुजा कुमारी (वय 28) असे आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. याप्रकरणी पुजा यांचे वडील रामधनी प्रसाद (वय 62 रा. झारखंड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रकाश कुमार (रा. भोईरवाडी, माणगाव) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी रामधनी यांची मुलगी एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. तर तिचा पती प्रकाश कुमार हा इंजिनियर असून, तो आयटी कंपनीत नोकरी करतो. पुजा शाळेत नोकरी करण्यावरून प्रकाश कुमार तिला त्रास देत होता. प्रकाश याने तिला जाणीवपूर्वक नोकरी सोडण्यास भाग पाडले होते.
पतीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून अखेर पुजा हिने राहत्या घराच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पुजाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.14) रात्री पावणे बाराच्या सुमारास घडली.
पतीविरोधात गुन्हा दाखल..
पुजा कुमारी यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुजाच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.