Pimpari Chinchwad News : पिंपरी, (पुणे) : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला वाकड पोलिसांनी गुरुवारी (ता. १७) पहाटे थेरगाव येथील डीमार्ट जवळ जेरबंद करण्यात आले आहे. तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन कोयते, मिरची पावडर, मोबाईल, टेम्पो आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी सापळा रचून चौघांना अटक केली….
शाम हरी गाढवे (वय-२१, रा. निगडी), अतिश भारत सिरसाट (वय-१९, रा. चिंचवड), नवनाथ दिगंबर साठे (वय- ३५, रा. थेरगाव. मूळ रा. खुडूस, ता. माळशिरस, जि. सोलापूर), शुभम सिद्राम कांबळे (वय – १९, रा. पिंपरी, मूळ रा. कामटी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर करणसिंग ऊर्फ कल्ल्या चरणसिंग टाक (वय – १९, रा. पिंपरी) हा पळून गेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिस गुरुवारी मध्यरात्री वाकड, थेरगाव परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी पोलिसांना माहिती मिळाली की, थेरगाव येथील डीमार्ट जवळ काहीजण संशयितरीत्या थांबले असून, त्यांच्याकडे घातक शस्त्रे आहेत. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचला. पोलिस मागावर असल्याची चाहूल लागताच सर्वजण पळून जाऊ लागले. त्या वेळी पोलिसांनी शिताफीने चौघांना अटक केली. त्यांचा पाचवा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
आरोपींकडून पोलिसांनी तीन कोयते, मिरची पावडर, मोबाईल फोन, तीनचाकी टेम्पो, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडे चौकशी केली असता ते वाकड परिसरात बंद असलेली दुकाने, मॉल, डी मार्ट तसेच चालू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षकांना कोयत्याचा धाक दाखवून दरोडा घालणार असल्याचे सांगितले. पोलिसांनी चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून आरोपी अतिश शिरसाठ याच्यावर वाकड, पिंपरी, चिंचवड पोलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. शाम गाढवे याच्यावर तळेगाव दाभाडे, सांगवी, चिंचवड पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. तर करणसिंग टाक याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शंतनू नाईक निंबाळकर, सहायक फौजदार राजेंद्र काळे, पोलिस अंमलदार वंदू गिरे, अतिक शेख, रमेश खेडकर, गिलबिले, लोखंडे यांनी केली.