Pimpari Chinchwad News : पुणे : एखाद्या दक्षिणात्य चित्रपटात शोभावा असा थरारक प्रकार आज पिंपरी-चिंचवड ते सासवड या दरम्यान घडला. पिंपरी-चिंचवड येथून भरदिवसा घरासमोरून अपहरण केलेल्या मुलाची सासवड पोलिसांनी सुखरूप सुटका केली. अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांकडे ३० लाखांच्या खंडणीची मागणी केली. मात्र, पोलिसांची तत्परता आणि समन्वय यामुळे हा मुलगा सुखरूप पालकांच्या ताब्यात पोहोचला.
या प्रकरणात सासवड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चारचाकी गाडीसह तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय २१ वर्ष), अर्जुन सुरेश राठोड (वय १९ वर्ष, दोघेही रा. दत्त मंदिर शेजारी, मारुंजी, पुणे), विलास संजय मस्के (वय २२ वर्ष, रा. शिवार वस्ती, भूमकर चौक, पुणे, मूळ गाव पिंपळगाव, ता. जामखेड, जि. नगर) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तिघांकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल, सत्तूर, कटावणी, लांब पात्याचा कोयता, तोंड लपवण्याचे मास्क, एक लोखंडी हातोडी, तीन मोबाईल जप्त केले आहेत.
गुन्हा दाखल
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथून १४ वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या सासवड पोलिसांनी आवळल्या आहेत. आज सकाळी या आरोपींनी काळया रंगाच्या झेन कारमधून हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून या मुलाचे अपहरण केले. याची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवडचे पोलीस आणि दरोडा विरोधी पथक सजग झाले आणि त्यांनी आरोपींनी ज्या मोबाईल क्रमांकावरून खंडणीसाठी मुलाच्या वडिलांना फोन केला होता, त्याचे लोकेशन शोधण्यास सुरुवात केली.
अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांना या संदर्भातील माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सहाय्यक निरीक्षक बाजीराव ढेकळे, विनोद महागडे, फौजदार श्रीराम पालवे आदींच्या नेतृत्वाखाली वेगवेगळी पथके करण्यात आली आणि सासवड शहरात येणाऱ्या रस्त्यावर त्याची शोध मोहीम सुरू झाली.
विनोद महागडे, सुनील चिखले, पोलीस हवालदार रुपेश भगत, लियाकत मुजावर, किसन कांतोडे सुरज नांगरे, सुहास लाटणे, जब्बार सय्यद असे एक पथक जुना कोडीत नाका ते सोपानकाका मंदिराच्या रस्त्यावर शोध घेत असताना सिद्धिविनायक आटो गॅरेज समोर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कळवल्याप्रमाणे एक गडद निळ्या रंगाची मारुती झेन कार संशयास्पदरित्या समोर येताना दिसली.
या वेळी सहायक निरीक्षक महांगडे यांनी पथकाला सूचना करताच, संबंधित चार चाकीला गाड्या आडव्या लावून चारचाकी थांबवली आणि त्यांच्यावर पिस्तूल रोखून अपहरण केलेल्या लहान मुलाला त्यांच्या ताब्यातून सुखरूप पोलिसांनी ताब्यात घेतले. तिघांना पोलिसांनी लागलीच ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी पेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा झालेल्या या थरारनाट्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आईला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे कमी पडत होते म्हणून ताथवडे, हिंजवडी परिसरातून एका व्यावसायिकाच्या १४ वर्षाच्या मुलाला शस्त्राचा धाक दाखवून आरोपींनी तीस लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.