पुणे : तळजाई येथे झालेल्या भांडणातील मुलांना घेऊन ये, असे म्हणून मुलाच्या गळ्याला धारदार हत्यार लावून जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता मुलाला नग्न करुन फोटो काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना लक्ष्मीनगर येथील शाहु कॉलेज येथील सूर्या चौक आंबेगाव व तळजाई पार येथे गुरुवारी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीसांनी सराईत गुंडांसह टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे. अभिजित पाटील ऊर्फ मायाभाई (रा. जनता वसाहत), प्रमोद कळंबे असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे धनकवडीत येथे राहतात. तर त्यांचा मुलगा शाहु कॉलेज परिसरात असताना आरोपी साई, सुमित यांनी त्याला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसविले आणि साई सिद्धी चौकापासून सूर्या चौकात नेले व त्यानंतर तळजाई पार येथे मोकळ्या मैदानात नेले. त्यानंतर आरोपी अभिजित पाटील याने मुलाला काल तळजाई येथे झालेल्या भांडणातील मुलांना घेऊन ये, असे म्हणून धारदार हत्यार गळ्याला लावून खल्लास करुन टाकण्याची धमकी दिली. तसेच मुलाचे सर्व कपडे काढून नग्न करुन त्याचे फोटो काढले.
दरम्यान, मुलाने ही बाब वडिलांना सांगितली. मुलाच्या वडिलांनी तातडीने दत्तवाडी पोलीस ठाणे गाठले. आणि याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अभिजित पाटील ऊर्फ मायाभाई, प्रमोद कळंबे व त्याच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कामे करीत आहेत.