पुणे : कारसाठी ५ लाख रुपये न दिल्याने विवाहितेला मारहाण करून हाकलून दिल्याची धक्कादायक घटना लोणी कंद (ता. हवेली) येथे नुकतीच घडली आहे. याप्रकरणी मुरूड (जि. लातूर) पोलीस ठाण्यात सासरकडील ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी वैष्णवी स्वप्नील कंद (रा. सारसा,ता. जि. लातूर) यांनी मुरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पती स्वप्नील नवनाथ कंद, संगीता नवनाथ कंद, नवनाथ वामन कंद, वनिता भारत खोंडे, शिवाजी नामदेव कंद, मिना नामदेव कंद (सर्व रा. लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे) यांच्यासह ८ जणांवर कलम ४९८, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारसा (ता. लातूर) येथील वैष्णवी बालाजी भिसे यांचा लोणीकंद (ता. हवेली, जि. पुणे) येथील स्वप्नील नवनाथ कंद यांच्याशी फेब्रुवारी २०२२ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर एक महिना सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर मात्र तु मनोरूग्ण आहेस. असे हिनवून वारंवार शिवीगाळ करणे, उपाशीपोटी ठेवून अपमानास्पद वागणूक सुरू केली.
त्यानंतर सासरकडील मंडळींनी आपल्याला कार घ्यायची आहे. तुझ्या वडिलांकडून पाच लाख रूपये घेऊन ये, तुला आम्ही फुकट सांभाळायचे का? असे म्हणत वारंवार छळ केला. पैसे घेऊन ये नाहीतर तू घरात रहायचे नाही म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच पतीसह सासरच्या मंडळींनी कोऱ्या बाँडवर सही कर म्हणून दमदाटी केली.
दरम्यान, पिडीत विवाहितेने ५ लाख रुपये देण्यास व बाँडवर सही करण्यास नकार दिल्याने, सासरकडील मंडळींनी मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. याप्रकरणी वैष्णवी कंद यांनी मुरूड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार मुरूड पोलीस ठाण्यात सासरकडील ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.