(Pargaon )पारगाव (ता. आंबेगाव) : पारगाव जवळे रस्त्यानजिक येथील ढोबळे मळ्यात चार दिवसांपूर्वी गुरुवारी (ता. ३० मार्च) शेतात शेळ्या मेंढ्यांच्या वाड्याशेजारी झोपलेल्या बाळू नाथा घुले (वय २८) या मेंढपाळावर बिबट्याने झोपेत हल्ला करून जखमी केले होते. त्यानंतर पारगाव येथील ढोबळे मळ्यात वन विभागाने पिंजरा लावला होता. या पिंजऱ्या मंगळवारी (ता. ४) पहाटे बिबट्या जेरबंद झाला.
मेंढपाळावर केला होता हल्ला…!
या हल्ल्यात बाळू घुले यांच्या डाव्या कानाचा अर्धा भाग तुटला आहे. त्यामुळे पारगाव, ढोबळे मळा या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. वनविभागाने ढोबळे मळा परिसरात त्वरित पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. वनविभागाने बढेकर-ढोबळे मळ्यातील संदिप कचरदास बढेकर पिंजरा लावला. या पिंजऱ्यात बिबट्या मंगळवारी (ता. ४) पहाटे जेरबंद झाला. बाळू घुले या मेंढपाळावर हल्ला केलेला हाच बिबट्या असावा, असा अंदाज ग्रामस्थ वनविभागाने व्यक्त केला आहे.
जेरबंद झालेला बिबट्या हा नर जातीचा असून अंदाजे तीन वर्षे वयाचा असल्याचे वनपाल एस. यू. भालेराव यांनी सांगितले. वनरक्षक साईमाला गीत्ते व त्यांच्या सहकार्यांनी जेरबंद झालेल्या बिबट्याला माणिकडोह (ता. जुन्नर) येथिल बिबट निवारा केंद्रात हलविले. या परिसरात बिबट्याचा अनेक दिवसांपासून वावर आहे. शेतकरी, नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले होते. आता बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे.