सुरेश घाडगे
परंडा : विद्युत मोटारी, केबल व इलेक्ट्रीक साहित्य चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना परंडा पोलिसांनी बुधवारी (ता.७) मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.
सचिन भागवत गिरी (सांगवी जि. उस्मानाबाद) आणि समाधान कमलाकर गिरी (विठ्ठलवाडी बेंबळी) अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
परंडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परंडा तालुक्यातील सोनारी हरणवाडा परिसरातील गेल्या २० दिवसांपूर्वी ७० हून अधिक पंपाची १४ हजार फुट वायर चोरी गेली आहे. अंदाजे १ लाख ४० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे.
कुर्डूवाडी रोडजवळील शेतातील बोअर स्टार्टर, केबल चोरी गेल्याची घटना घडली होती. शेती उपयोगी साहित्य, विद्युत मोटारी, केबल, स्टार्रटर आदी इलेक्ट्रीक वस्तू चोरीच्या घटना राजरोसपणे घडत होत्या. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती नवनाथ जगताप यांच्यासह शेतकऱ्यांनी केली होती.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी चोरट्यांना पकडण्यासाठी पथके तयार केली. परंडा तालुक्याच्या परिसरात रात्रीची गस्त वाढवली. बुधवारी (ता.७) मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे पथक शहराच्या गस्त घालत असताना, पोलिसांना परंडा-बार्शी मार्गावर दुचाकीवरील दोघेजण संशयास्पद आढळून आले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुचाकीवरील दोघांनी पळ काढला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे गुप्ती, पक्कड, एक्सा ब्लेड असे साहित्य मिळून आले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी सचिन गिरी व समाधान गिरी यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी केबल चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यांच्याकडून केबलसह तब्बल ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.