Vaai Crime पाचगणी : पिकांना पाणी देण्याच्या काळात चोरट्यांनी वेलंग (ता.वाई) शिवारातून शेतकऱ्यांची केबल वायर चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले असून शेतकरी अडचणीत आले आहेत.
दोनशे दहा मीटर केबल चोरली…!
वेलंग येथील शेतकरी कृष्णदेव जाधव यांची धोम धरणालगत शेती आहे. शेतीसाठी पाणी पुरवठा स्कीम असुन सदर स्कीम सठी सोना इंजिनीरींग कंपनीची एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची २१० मीटर केबल वायर वापरण्यात आली होती. १२ एप्रिल रोजी रात्री बारा वाजेपर्यंत जाधव शेतात होते व पाण्याची मोटार सुरू होती. त्यानंतर ते घरी आल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी मातीत गाडलेली दोनशे दहा मीटर केबल चोरुन नेली.
चोरीच्या दोन दिवसांपूर्वी सदर चोरट्यांनी केबल तोडून चोरीचा प्रयत्न केला होता. दोन वर्षांपूर्वीही जाधव यांची तीनशे मीटर केबल चोरीला गेली होती. विशेष बाब म्हणजे जाधव यांच्या शेजारीच दोन शेतकऱ्यांच्या पाणी पुरवठा स्कीम असून त्यांची केबल वायर उघड्यावर असूनही त्यांची चोरी होत नसल्याचे कृष्णदेव जाधव यांनी आश्चर्य व्यक्त केले. जाधव यांना मुद्दामहून कोणीतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असून चोरट्याट बंदोबस्त करावा. केबल वायरचा तपास लावावा, अशी मागणी लेखी अर्जाद्वारे जाधव यांनी वाई पोलिस ठाण्यात केली आहे.