पुणे : गाडीला ओव्हरटेक केल्याच्या रागातून एकाला ४ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या मधून दुचाकी चालवणाऱ्यांना हॉर्न वाजवून बाजूला होण्यास सांगितल्याच्या कारणावरुन चार जणांनी चारचाकी गाडीचा पाठलाग करुन एकाला बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी २१ फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वारजे परिसरातील ओव्हेल नेस्ट सोसायटी जवळ घडली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी दोन जणांना अटक करुन त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे फातिमानगर येथे कामाला आहेत. बुधवारी रात्री ते कामावरुन चारचाकी गाडीतून घरी जात होते. त्यावेळी आर.एम.डी. कॉलेज समोरील गार्डन सिटी चौकातून वारजेकडे वळण घेत असताना दोन दुचाकीवरुन आरोपी रस्त्याच्या मधून जात होते.
त्यामुळे फिर्यादी यांनी हॉर्न वाजवून त्यांना बाजूला होण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांचा घरापर्यंत पाठलाग केला. सोसायटीच्या गेट समोर दुचाकी आडवी लावून फिर्य़ादी यांची चारचाकी गाडी अडवली. त्यानंतर हाताने आणि विटांनी जबर मारहाण केली. यात फिर्य़ादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वारजे माळववाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना पोलीस अंमलदार अजय कामठे यांना सीसीटीव्ही फुटेजमधील दुचाकीस्वार वारजे येथील म्हाडा वसाहतीत राहणारे असल्याचे समजले. त्यानुसार तपास पथकाने इरफान करीम शेख (वय-१९), अजय विठ्ठल खरात (वय-१९ रा. म्हाडा वसाहत वारजे) यांना अटक केली. तर त्यांच्या सोबत असलेल्या २ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोघ ओलेकर करत आहेत.