बरेली : उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये एक अत्यंत संतापकनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एका महिलेने आरोप केला आहे, की तिच्या पतीने नशेत असताना आपला अश्लील व्हिडिओ शूट केला असून, तो तिच्यावर वेश्याव्यवसाय करण्यासाठी बळजबरी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातल्या बरेलीमधल्या किला पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातली ही घटना आहे. पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, तिने सांगितलं, की सहा महिन्यांपूर्वीच तिचा विवाह एका तरुणाशी झाला होता. विवाह ठरला, तेव्हा त्या तरुणाकडच्या मंडळींनी सांगितलं, की तो तरुण मुंबईत कापड व्यापारी आहे. तसंच, त्याचा व्यापार चांगला चालतो. पीडितेच्या कुटुंबीयांनी तिच्या पतीला हुंडा म्हणून कार आणि 15 लाख रुपये रोकड दिली होती. तरीही सासरकडची मंडळी यावर समाधानी नव्हती.
पीडितेने पुढे सांगितलं, की एवढा हुंडा देऊनही तिच्यावर आणखी हुंडा आणण्यासाठी दररोज दबाव आणला जात होता. एके दिवशी तिला कळलं, की तिच्या पतीचे अनेक मुलींसोबत संबंध आहेत. त्याला तिने विरोध केला, तर पतीने तिला मारहाण केली. त्यानंतर पतीने तिला गुंगीच्या गोळ्या देऊन, ती बेशुद्ध पडल्यावर तिचा अश्लील व्हिडिओ शूट केला. इतकंच नाही, तर तिने आपल्या मित्रांशी शारीरिक संबंध ठेवावेत अशी मागणी सुद्धा पती तिला नेहमी करत असे.