पिंपरी : रावेतमधील लॉजिंग मध्ये खुलेआम चालत असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दापाश करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला यश आले आहे. पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने लॉजवर छापा टाकून एका महिलेची सुटका केली आहे. एकास अटक करून एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भीमराव दत्तोबा म्हस्के (वय ६०, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर काळेवाडी येथील एका ३२ वर्षीय महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील एका लॉजवर खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा आरोपी भीमराव म्हस्के व त्याची साथीदार महिला हे एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, पोलिसांनी या छाप्यात ८ हजार ४० रुपयांचा ऐवज जप्त करून आरोपी भीमराव म्हस्के याला अटक केली आहे. तर एका ३२ वर्षीय महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच एका पिडीत महिलेची सुटका केली आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. २) सायंकाळी केली आहे.