लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नर येथे दोन दुचाकींची जोरदार धडक झाल्याची घटना मंगळवारी (ता.२७) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरून दोन्ही दुचाकीस्वार हे पुण्याच्या दिशेने चालले होते. तेव्हा कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नर येथे त्यांची दुचाकी आली असता, दोघांच्या दुचाकींची जोरदार धडक झाली.
यातील एक दुचाकी ही रस्त्यावरच पडली. तर दुसरी दुचाकी ही २५ ते ३० फुट घसरत जाऊन रस्त्यालगत असलेल्या दुभाजकाला जोरदार धडकली. या दुचाकीस्वाराच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रसंगवधान दाखवून अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला उपचारासाठी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे एका तरुणाचे सुदैवाने प्राण वाचले आहे. जखमी तरुणाचे नाव व पत्ता समजू शकलेला नाही.
वाहतूक शाखेचे कर्मचारी नेहमीप्रमाणे गायब…!
एमआयटी कॉर्नर येथे दोन दुचाकींचा अपघात झाला होता. तेव्हा या ठिकाणी कोणताही वाहतूक पोलीस कर्मचारी उपलब्ध नव्हता. त्यामुळे अपघातात जखमी झालेल्या तरुणाला पोलिसांची मदत मिळण्याआगोदारच स्थानिक नागरिकांनी मदत केली आहे. यामुळे वाहतूक पोलीस नक्की कुठे असतात ? अपघाताग्रस्त नागरिकांना मदतीसाठी कधीच उपलब्ध नसतात, अशी चर्चा नागरीकांमध्ये चांगली रंगली आहे. यामुळे वाहतूक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.