पुणे : बंगला विकत घेतो, असे सांगून कागदपत्राच्या झेरॉक्स घेऊन त्यावरुन बनावट कागदपत्रे तयार केली. त्याआधारे बंगला दुसर्याला विकला. त्याने त्या बंगल्यावर २ कोटी २१ लाख २० हजार रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बिबवेवाडी परिसरात घडला आहे.
मिलिंद भुसारी (रा. गुरुवार पेठ), राजेश रमेश खंडेलवाल आणि अन्य दोघांविरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बिबवेवाडी येथील ७५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पत्नींच्या नावाने बिबवेवाडीतील सहानी सुजन पार्कमध्ये बंगला आहे. मिलिंद भुसारी याने बंगला विकत घेतो, असे सांगून त्यांच्याकडून बंगल्याचे कागदपत्रांची झेरॉक्स प्रती घेतल्या.
त्यातील सीटीएस नंबरमध्ये फेरफार करुन मालमत्तापत्रक बनावट बनविले. तसेच फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या नावाने दुसर्यांचे फोटो लावून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तयार केले.
फिर्यादीच्या बंगल्याचा पुणे महानगर पालिकेचा बांधकाम चालू करण्याचा दाखला व बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला याचा वापर केला. फिर्यादी यांचा बंगला राजेश खंडेलवाल यांना विकला. त्यावर खंडेलवाल यांनी २ कोटी २१ लाख २० हजार रुपयांचे होम लोन बँकेतून मंजूर करुन फिर्यादी यांची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.