शिरूर, (पुणे) : शिरूर -मलठण रस्त्यावरील अण्णापूर ग्रामपंचायत हद्दीत चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहरीत पडून एकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
गोपीनाथ पठाडे रा. आसेगाव रस्ता, शेवगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपीनाथ पठाडे हा तरुण शिरूर -मलठण रस्त्यावरून शिरूरकडून मलठणच्या बाजूकडे निघाले होते. पुन्हा येवले माथा येथून मागे वळून पुन्हा शिरुरकडे जात असताना उसाच्या ट्रक्टरला ओव्हरटेक करताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पठाडे यांची गाडी रस्ता सोडून पंधरा फुट लांब असणाऱ्या व कठडा नसणाऱ्या विहीरीत पडली.
दरम्यान, घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, चालक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमाने यांनी धाव घेत परिसरातील नागरीकांच्या मदतीने गाडीसह त्याला बाहेर काढले. परंतू उशिरा मदत मिळाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिरूर तालुक्यात रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी कठडे नसलेल्या धोकादायक विहीरी असून त्यांना कठडा नसल्याने मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.