ज्ञानेश्वर मिडगुले
सणसवाडी (पुणे) : पुणे-नगर महामार्गावरील सणसवाडी (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत महामार्गावरील रस्ता दुभाजकात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी (ता. १८) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. दुभाजकात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांना डयुरोसॉक्स कंपनीचे समोर हायवेचे मधील पट्यात मृत इसमाचे प्रेत निदर्शनास आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्राथमिक पाहणीनंतर मृताचे वय अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्याच्या तोंडावर, डोक्यावर, चाकूने वार केल्याचे दिसून येत आहे. मृताचे गळ्यात हेडफोन असून पायात लाल रंगाच्या सॅन्डल आहे. तब्ब्येत मजबूत असून दाढी वाढलेली आहे.
संबंधित युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही. हा कुठल्या गँगवारमधला खून आहे की ईतर कारणासाठी याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. तसेच मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहेत. कुणाला या प्रकाराची माहीती असल्यास शिक्रापुर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.