पुणे : नागरिकांमध्ये दहशत निर्माण कारण्यासाठी पिंपरी चिंचवड येथील गावगुंडांनी २५ ते ३० चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यात दहशत माजविण्याच्या उद्देश्याने गोळीबार करण्यात आली असल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा ही घटना समोर आल्याने पिंपरी चिंचवडकरांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाकड आणि सांगावी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही तोडफोड करण्यात आली आहे. यात रिक्षा आणि चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पिंपरी चिंचवड पोलीस मोठ्या प्रमाणात गस्त घालत असून देखील गुंडांचा टोळक्याने हौदोस घातला.
या टोळक्याने पिंपळे सौदागर परिसरात प्रचंड फोडाफोडी केल्याने येथील नागरिक मोठ्या दहशतीखाली आहेत. रिक्षातून आलेल्या या गुंडांच्या टोळीने कोयते आणि सिमेंटचे गट्टू घेऊन ही फोडाफोड केली.
वाकड आणि सांगावी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तोडफोड करणाऱ्या गुंडांचा शोध घेत आहेत. मात्र ३१ डिसेंबर रोजी पोलिसांची गस्त कमी पडल्याने गावगुंडांनी आमच्या वाहनांची तोडफोड केली, असा आरोप नुकसान झालेले स्थानिक नागरिक करत आहेत.