बारामती : वाढदिवसाच्या दिवशीच बारामती येथे एका ३ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाल्याने बारामतीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हि घटना बारामती शहरातील इंदापूर रोडवरील हॉटेल शिवम समोर घडली आहे.
अरहत थोरात असे या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी शुभांगी कांबळे यांनी बारामती पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संकेत प्रकाश खळदकर (रा. नानगाव, ता. दौड) यास बारामती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे कुटुंबासह नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीची भाची प्रिती प्रमोद थोरात (रा. मळद, ता. बारामती, जि. पुणे सध्या रा. सटवाजीनगर, बारामती जि. पुणे) यांचा मुलगा अरहत याचा वाढदिवस साजरा करून (९ ऑक्टोबर) रोजी रात्री साडेनऊ वाजता सुमारास येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे बारामती बौद्ध युवक संघटनेने आयोजित केलेला मेळावा पाहण्यासाठी निघाले होते.
प्रिती थोरात या चिमुकल्या अरहत व कुटुंबासह एसटी स्टँड चौक ओलांडून इंदापूर रोडने जय शिवम हॉटेल समोरुन पुढे चालत येत होत्या. रस्त्यात असलेला लोखंडी अँगल ओलांडून पुढे निघाले असताना अचानक भरधाव वेगाने एक मोटारसायकल येऊन अँगलला धडकली.तो लोखंडी अँगल फिर्यादीच्या पायाला व तीन वर्षाच्या अरहतच्या डोक्याला लागला. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्याला तात्काळ शहरातील वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र आम्ही अपघाताचे रुग्ण घेत नसल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, एका हॉस्पिटलमध्ये चिमुकल्याला दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला दवाखान्यात आणण्यास उशीर झाल्याचे सांगत मृत घोषित केले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या मोटरसायकल स्वार संकेत खळदकरसह प्राथमिक उपचार न देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी फिर्यादीत नमूद केली आहे.