कुंजीरवाडी (पुणे) : पुणे-सोलापुर महामार्गावर कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत स्वामी समर्थ मंदीराजवळ सहा ते सात जणांच्या टोळक्याने व्यंकटेश ट्रॅव्हल्सच्या बस चालकावर कोयता व तलवारीच्या साह्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार आज (रविवारी) सायंकाळी सात वाजनेच्या सुमारास घडला आहे. अज्ञात सहा ते सात जणांच्या टोळक्याने कोयता व तलवारीच्या साह्याने केलेल्या हल्ल्यात व्यंकटेश ट्रॅव्हल्सचा चालक गंभीर जखमी झाला असुन, टेंभुर्णी जवळ चारचाकी चालक व हल्ला झालेल्या ट्रॅव्हल्स चालकात झालेल्या वादातुन हल्ला झाला असल्याचा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान गोविंद अण्णा साबळे (वय- 30, रा. सोलापुर शहर) हे त्या सहा ते सात जणांच्या टोळक्याने कोयता व तलवारीच्या साह्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या ट्रॅव्हल्स चालकाचे नाव असुन, त्याला लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. गोविंद साबळे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
गोविंद साबळे हा सोलापूर येथील व्यंकटेश ट्रॅव्हल्सच्या बसवर चालक म्हणुन काम करतो. रविवारी सायंकाळी सात वाजनेच्य सुमारास पन्नासहुन अधिक प्रवाशी असलेली बस कुंजीरवाडी हद्दीत स्वामी समर्थ मंदीराजवळ एका प्रवाशाला उतरण्यासाठी थांबली होती. एका बाजुने बसमनधुन प्रवाशी उतरत असतांना, तीन मोटार सायकल वरुन आलेल्या सहा ते सात अज्ञात तरुणांनी अचानक गोविंद साबळेवर कोयता व तलवारीच्या साह्याने हल्ला चढवला. हल्लेखोर बसचा दरवाजा उघडुन हल्ला करणार हे लक्षात येताच, गोविंद याने बसचा दरवाजा आतुन ओढुन धरला. दरवाजा उघडला न गेल्याने, हल्लेखोरांच्या हातीतील कोयत्याचे वार गोविंदच्या हातावर चेहऱ्यावर बसले. यात तो जखमी झाला.
दरम्यान हा प्रकार जवळच उभे असलेले कुंजीरवाडीचे माजी सरपंच दादासाहेब तुपे यांच्या लक्षात येताच, त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. दादासाहेब तुपे यांचा आवाज ऐकुन लोक गोळा होत असल्याचे लक्षात येताच, हल्लेखोरांनी मोटार सायकलसह सोलापुर बाजुकडे पळ काढला. हल्लेखोर गेल्याचे दिसताच, दादासाहेब तुपे यांनी घडलेल्या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना कळवताच, दुसरीकडे जखमी गोविंद यास उपचारासाठी रुग्नालयात हलविण्याची सोय केली.
गोविंदवरील हल्ला टेंभुर्णी जवळील वादातुन?
गोविंद साबळे याच्या हल्ला कोणी व कशासाठी झाला याबाबत नेमकी माहिती मिळालेली नसली तरी, हा हल्ला टेंभुर्णी जवळएक चारचाकी चालक व ट्रॅव्हल्स चालक गोविंद साबळे याच्यात झालेल्या वादातुन हल्ला झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोविंद हा पुण्याकडे येत असतांना, साईड देण्याच्या कारणावरुन चार वाजनेच्या सुमारास टेभुर्णी जवळ एका चार चाकी वाहन चालकाशी वाद झाला होता अशी माहिती बस मधील प्रवाशांनी दिली आहे. गोविंदने चारचाकी वाहन चालकाची माफीही मागीतली होती. मात्र माफि मागुनही संबधित वाहन चालकांने गोविंदला शिवीगाळ करुन, तंगडे तोडणार असल्याची धमकी दिली होती. यातुनच वरील हल्ला झाला असावा असा कयास बांधला जात आहे.