पुणे : अनोळखी मोबाईलवरून आलेल्या मेसेज वरून चॅटिंग सुरू झाले. दोघांचा संवाद वाढल्यानंतर तरुणीने संबंधित व्यक्तीस व्हॉटसअप व्हिडिओ कॉल करून (न्यूड कॉल) कपडे उतरविण्यास सांगितले. त्यानंतर संबंधित तरुणाला त्या अनोळखी नंबर वरील व्यक्तीने ब्लॅकमेल करायला सुरू केली. त्याच्याकडून हजारो रुपये उकळले. या त्रासाला कंटाळून पुण्यात एका तरुणाने आत्महत्या केली आहे.
अमोल राजू गायकवाड (रा. तानाजी नगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात मोबाईल धारकांकडून अमोल गायकवाड यांच्या व्हाट्सअॅपवर मेसेज येण्यास सुरुवात झाली. मेसेज आलेल्या क्रमांकावर एका महिलेचा डीपी होता. त्यानंतर या महिलेने तरुणासोबत चॅटिंग सुरू केले. त्यानंतर संबंधित तरुणास न्यूड कॉल केले. त्यानंतर तरुणास ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली.
दरम्यान, त्यानंतर त्या महिलेने त्याच्याकडे पैशांची मागणी करून वेळोवेळी पैसे घेऊन मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तरुणाला हा त्रास रोजचाच होऊ लागला त्यात त्याचा मानसिक त्रासही वाढला. शेवटी मानसिक त्रासाला कंटाळून संबधित तरुणाने आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेची माहिती घेतल्यानंतर अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.