नागपूर : “A फॉर आफताब पुनावाला, A फॉर आदित्य ठाकरे, सगळ्या विकृतींचं नाव एकच! श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात जसं आफताब पुनावालाची नार्को टेस्ट झाली आणि सत्य बाहेर आलं. तसंच आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा. सुशांतसिंह केसमधील सत्य समोर येईल” अशी थेट मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात केली.
दिशा सालियानं मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळ सभागृहात देखील उमटले. भरत गोगावले व नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना हा मुद्धा उपस्थित केला. त्यानंतर मात्र विधिमंडळात गोंधळ पाहायला मिळाला.
शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख केला, त्यानंतर नितेश राणे बोलायला उभे राहिले. त्यावेळी सभागृहात गोंधळाला सुरुवात झाली. सभागृहातील गोंधळ पाहून विधानसभा अध्यक्षांनी १० मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले.
त्यानंतर पुन्हा सभागृह सुरु झाल्यानंतर नितेश राणे व इतर नेत्यांनी दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आणि पुन्हा सभागृहात गोंधळाला सुरुवात झाली. त्यानंतर पुन्हा एकदा सभागृह २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
काल शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सुशांतसिंग राजपूत व दिशा सालियन केस नव्याने चर्चेत आली आहे.