पुणे : पुण्यातील वानवडी परिसरातील भैरोबा नाला येथे टोळक्याने कोयते उगारुन दहशत माजविल्याची घटना समोर आली आहे. टोळक्याने मोटार, रिक्षा, टेम्पो, दुचाकी अशा नऊ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयुर उत्तम गायकवाड (वय-३२, रा. चिमटा वस्ती, भैरोबानाला पुणे-सोलापूर रस्ता, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भैरोबा नाला परिसरात सेंट पॅट्रीक चर्चजवळ चिमटा वस्ती आहे. येथे गुरुवारी दुपारी टोळके वस्तीत घुसले. त्यांच्याकडील कोयते आणि दांडके उगारुन टोळक्याने दहशत माजविली. या भागातील मोटारी, रिक्षा, टेम्पो, दुचाकींची दांडक्याने तोडफोड करुन नुकसान केले. तसेच टोळक्याने रहिवाशांना देखील शिवीगाळ केली.
या घटनेनंतर मयूर गायकवाड घरातून बाहेर पडले. तेव्हा टोळक्याने त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. ‘आम्ही या भागातील भाई आहोत. कोणी मध्ये पडले तर त्याला जिवे मारु’, अशी धमकी देऊन टोळके पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक फौजदार कुंभार तपास करत आहेत.