लोणावळा (पुणे) : पर्यटनस्थळी निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो, याची प्रचिती पुन्हा एकदा लोणावळ्यात आली आहे. टायगर पॉईंट येथे नातेवाईकांना व्हिडीओ कॉलवर परिसराचे दृश्य दाखवत असताना भारतीय नौदलातील एका जवानाचा तोल जाऊन तो सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृत जवानाचे नाव राकेश कुमार मिश्रा (वय -49) असे असून ते भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी येथे मास्टर चीफ पेटी ऑफिसर पदावर कार्यरत होते. ते मूळचे दिल्लीतील मंगोलपुरी परिसरातील रहिवासी होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिश्रा हे त्यांचे सहकारी महेंद्र सिंह यांच्यासोबत टायगर पॉईंट परिसराची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांच्या मुलाने मित्रांसोबत येथे सहलीचे नियोजन केले असल्याने त्या अनुषंगाने ते परिसराची माहिती घेण्यासाठी आले होते.
व्ह्यू पॉईंटवर पोहोचल्यानंतर महेंद्र सिंह हे एका झाडाखाली थांबले होते. दरम्यान, राकेश मिश्रा यांनी आपल्या नातेवाईकाला मोबाइलवरून व्हिडीओ कॉल केला. कड्यावरील निसर्गरम्य दृश्य दाखवत असताना झाडाजवळ त्यांचा तोल गेला आणि ते थेट खोल दरीत कोसळले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, गंभीर दुखापतीमुळे मिश्रा यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. महेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंदकरण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.







