कोतवाली, (नगर) : फोन करण्याच्या बहाण्याने मित्राकडून मोबाईल फोन व रोख रक्कम लुटून पळून गेलेल्या सराईत आरोपीला कोतवाली पोलिसांनी गुरुवारी (ता. ०५) अटक केली आहे.
आकाश अशोक पवार (रा. केडगाव ता. जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मिथुन भिमराव सकट (वय ३५, रा. सुवर्ण नगर, बाणेश्वर मंदीराजवळ, केडगाव अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथुन सकट हे मंगळवारी (ता. ०३) कायनेटीक चौकात उभे असताना त्याचा ओळखीचा मित्र आकाश पवार तेथे आला व मोबाईल फोन त्याचे घरी फोन करण्यासाठी मागीतला. यावेळी सकट यांनी फोन दिला मात्र आरोपी फोन घेऊन दुचाकीवरून रेल्वे स्थानकाकडे निघून गेला व अर्ध्या तासाने परत आला.
यावेळी सकट यांनी त्याला त्याच्याकडे मोबाईल फोनची मागणी केली असता त्याने फोन देण्यास नकार दिला. यावेळी बळजबरीने सकट यांनी फोन काढून घेतला. याचा पवार याला राग आला व त्याने लाथाबुक्क्यांनी सकट यांना मारहाण केली. व त्याचा मोबाईल फोन व रोख रक्कम अडीच हजार रुपये घेऊन निघून गेला. अशी फिर्याद कोतवाली पोलिसात सकट यांनी दिली होती. त्यानुसार पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचा पोलीस गुरुवारी (ता. ०५) तपास करताना पोलिसांना गुप्तबातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, आरोपी पवार हा केडगाव गावात दिसून येत आहे. त्यानुसार वरीष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार आरोपी पवार याला पोलिसांनी सापळा रचून तात्काळ ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून अडीच हजार रुपये जप्त करण्यात आले. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील करीत आहे.
दरम्यान, सदरची कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील, पोलीस नाईक रविद्र टकले, दिपक रोहकले, शाहीद शेख, प्रमोद लहारे, सचिन लोडगे व याकुव सैय्यद यांनी केली आहे.