कोतवाली, (नगर) : चोरीतील मोटरसायकल व मोबाईल विक्री करण्यासाठी बीड येथे घेऊन जात असताना तीन जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सनि जितेंद्रसिंग गोवे (वय १९, रा. चिंचोली, ता. पाटोदा जि.बीड) असे आरोपीचे नाव असून ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी दोघे विधी संघर्ष बालक आहेत. शहरातील इम्पेरियल चौकात शुक्रवारी (ता. २५) ऑगस्ट रोजी कोतवाली पोलिसांनी हि कामगिरी केली आहे. याप्रकरणी तिघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना दुचाकीवरून येत असलेल्या तीन जणांवर संशय आल्याने त्यांनी तिघांना अडवून झडती घेतली. चोरीतील एक दुचाकी व चार मोबाईल मिळून आले. आरोपींना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता पुणे जिल्ह्यातील रांजणगाव शिरूर आणि भीमा कोरेगाव परिसरात चार मोबाईल नागरिक रस्त्यावरून बोलत जात असताना जबरदस्तीने हिसकावल्याची कबुली त्यांनी दिली.
चोरीतील हा मुद्देमाल विक्री करण्यासाठी बीड येथे घेऊन जात असल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या तिघांनी दिली आहे. चोरी केलेली दुचाकी व चार मोबाईल असा ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे, तनवीर शेख, गणेश धोत्रे, राम हंडाळ, सतीश भांड, गणेश ढोबळे, विजय गावडे, संतोष बनकर, अर्जुन फुंदे, अब्दुलकादर इनामदार, सलीम शेख, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अतुल काजळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.