Nagar News : अहमदनगर : जिल्ह्यातील वडगांव गुप्ता येथील महार वतन हाडोळा इनाम जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून, संबंधित जमिनीची खरेदी-विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगरचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, सहाय्यक दुय्यम निबंधक, मंडलाधिकारी तलाठ्यासह एकुण ३८ जणांविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा अहमदनगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.
महसूल विभागात खळबळ!
अहमदनगर तालुक्यातील वडगांव गुप्ता येथील गट नं. २०३ (क्षेत्र २ हेक्टर, ९७ आर पोट खराबा ०.०९ आर. गट नं. २०५, एकूण क्षेत्र १ हेक्टर, ३४ आर) ही कनिष्ट महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ ब या जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून खरेदी-विक्री करण्यात आली होती. ही घटना ३ जानेवारी २००६ ते ६ जानेवारी २००६ या दरम्यानच्या काळात घडली होती. (Nagar News) या प्रकरणाचा तपास करत एसीबीने ६ शासकीय अधिकारी व कर्मचारी व ३२ खासगी व्यक्ती अशा ३८ जणांविरोधात एम.आय.डी.सी.पो.स्टे., जि. अहमदनगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम १३(१) (ड) सह १३(२) सह भा.दं.वि. क.१६७ ४२० १०९ प्रमाणे १९ जुलै २०२३ रोजी गुन्हा दाखल केला.
अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, वडगांव गुप्ता शिवारातील गट नं. २०३ येथील जमीन ही कनिष्ट महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ ब ची जमिन जुन्या शर्तीवर करण्यासाठी अहमदनगरचे तत्कालीन तहसिलदार एल. एन. पाटील यांनी बेकायदेशीर परवानगी दिली होती. (Nagar News) त्यांनी काढलेल्या आदेशाला तत्कालीन वडगाव गुप्ताचे तलाठी एल. एस. रोहकले, नालेगाव मंडलाधिकारी दुर्गे यांनी मदत केली होती व खरेदी विक्री व्यवहाराच्या नियमबाहय फेरफार- नोंदी घेवून खासगी व्यक्ती उत्कर्ष पाटील व अजित लुकड यांना मदत केली आहे.
दरम्यान, तत्कालीन अपर जिल्हाधिकारी व्ही. टी. जरे व उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुठे यांना याचा आदेश बेकायदेशीर असल्याची माहिती होती. तरी देखील त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. तत्कालीन सहाय्यक दुय्यम निबंधक दिलीप बबन निराली यांनी खरेदी-विक्रीचे बेकायदेशीर दस्त नोंदवून घेतल्याचे तक्रारी अर्जात नमूद केले आहे. (Nagar News) ही जमीन महार वतन हाडोळा इनाम वर्ग 6 ब ची असल्याची माहिती असताना या सर्वांनी मिळून जमिनीचे खोटे कागदपत्र तयार केली. तसेच जमिनीच्या खरेदी-विक्रिचा व्यवहार करुन शासनाची फसवणूक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यासह एकूण ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एसीबीचे उपअधीक्षक प्रवीण लोखंडे करीत आहेत.
गुन्हा दाखल केलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे
– तत्कालीन तहसिलदार अहमदनगर एल. एन. पाटील, तत्कालीन तलाठी वडगाव गुप्ता एल. एस. रोहकले, तत्कालीन मंडळ अधिकारी दुर्गे, तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अहमदनगर व्ही. टी. जरे, तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुठे, तत्कालीन सहाय्यक दुय्यम निबंधक अहमदनगर दिलीप निराली.
– जमिनीचे भोगवाटादार
दिनकर आनंदा शिंदे, विनायक शंकर शिंदे, बाबु आनंदराव शिंदे, मोहन आनंदराव शिंदे, वामन किसन शिंदे, यादव किसन शिंदे, सदाशिव केशव शिंदे, रामभाऊ केशव शिंदे, सुनिल केशव शिंदे, यादव केशव शिंदे, मालनबाई केशव शिंदे, लता शांतवण भाकरे, अरुण दगडु शिंदे, शालनबाई दगडु शिंदे, लक्ष्मण रामचंद्र शिंदे, मथुरा विष्णु शिंदे, संदीप विष्णु शिंदे, सुनिता रतन गायकवाड, नंदा शाम घाटविसावे, शालुबाई शाहुराव प्रभुणे, मच्छिंद्र आनंदराव शिंदे, लिलाबाई चंद्रभान पाडळे, शोभा बुद्धीराम ठाकूर
– संमती देणारे
वत्सलाबाई तुकाराम पाचारणे, सुशिला शांतवण घाटविसावे, तुळसाबाई मारुती नरवडे, छबुबाई भिवाजी साळवे, इंद्रायणी विठ्ठल जाधव, वत्सला वामन जाधव, कौसल्या दामु जगताप
– जनरल मुखत्यार
उत्कर्ष सुरेश पाटील (रा. श्रमिकनगर, अहमदनगर) जमीन खरेदी करणारे अजित कचरदास लुंकड (रा. आनंद दर्शन अपार्टमेंट, मार्केट यार्ड, अहमदनगर) यांच्यावर (Nagar News) एमआयडीसी पोलीस स्टेशन अहमदनगर येथे बुधवारी (ता. १९) भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा, आयपीसी १६७. ४२०, १०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रविण लोखंडे, पोलीस निरीक्षक राजु आल्हाट, पोलीस अंमदार संतोष शिंदे, रवींद्र निमसे, विजय गंगुले यांच्या पथकाने केली.