Nagar News : कोतवाली, (नगर) : पैशांची आवश्यकता असल्याने नऊ लाख रुपये रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची तक्रार देणारच फिर्यादी हा चोर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
शरद रावसाहेब पवार (वय ४० वर्ष, रा.द्वारकालॉन शेजारी, नेप्तीफाटा, ता. जि. अहमदनगर) असे चोरीचा बनाव करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी नऊ लाख रुपये किमतीची रोकड जप्त केली आहे.
नऊ लाख रुपये किमतीची रोकड जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. १४) हरिभाऊ बंडुजी शिंदे (रा. पुणे) यांनी कांदा चाळीवर काम करणाऱ्या मजुरांना पैसे देण्यासाठी त्यांच्याकडील कामगार शरद पवार याला नऊ लाख रुपये रोकड दिली होती. शरद रावसाहेब पवार हा पुणे येथून आल्यावर आयुर्वेदिक कॉलेजरोड वरून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोराने त्याच्याकडील पैशाची बॅग पळविल्याची फिर्याद त्याने कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. (Nagar News)
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पिंगळे यांचेसह गुन्हे शोध पथकाला घेऊन घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाला भेट देऊन आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली तसेच नागरिकांना विचारपूस केली असता अशी कोणतीही घटना त्या परिसरात घडली नसल्याचे तपासात समोर आले. तपासादरम्यान फिर्यादी वरच शंका आल्याने त्यांनी शरद पवार याची कसून चौकशी केली असता त्याने स्वतःच मालकाची रोकड चोरल्याची कबुली दिली.
पैशांची आवश्यकता असल्याने नऊ लाख रुपये नातेवाईकांकडे लपवुन ठेवल्याचे सांगितले. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील करीत आहेत. (Nagar News)
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि रविंद्र पिंगळे, पोसई प्रविण पाटील, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, रियाज इनामदार, अभय कदम, संदिप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, सागर मिसाळ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, अतुल काजळे, याकुब सय्यद यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (Nagar News)