(Nagar Crime) अहमदनगर : झेंडे लावण्यावरून सुरु झालेल्या वादात दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना वारूळवाडी (जि. अहमदनगर) गावात मंगळवारी (ता.४) रात्रीच्या सुमारास घडली आहे. तर संतप्त झालेल्या जमावाने रस्त्यावर उतरून काही ठिकाणी दगडफेक तर काही ठिकाणी वाहने जाळली आहेत. या घटनेत सातजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे नगर शहर व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश बोला यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. तर या घटनेच्या पार्श्वभूमीवर गजराज नगर, मनपा कार्यालय परिसर, झेंडीगेट, सर्जेपुरा या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेत सतीश साहेबराव कर्डिले (वय २६ रा. गजराज नगर), दीपक सुरेश बंनखीले (वय २२ रा. गजराज नगर ) यांच्यासह सात जण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार…!
गजराजनगर परिसरात झेंडे लावण्यात आले होते. त्यावरून दोन गटात गटात काहीसा तणाव निर्माण झाला होता. यातूनच मंगळवारी ,रात्री एका युवकास मारहाण करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या गटाच्या युवकांना मारहाण करण्यात आली. त्यातून वाद उफाळला. जमावाने दोन वाहने जाळली. तर एका वाहनाची तोडफोड केली.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप तसेच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगवले.
दरम्यान, हा वाद सुरू असतानाच इंद्रायणी हॉटेलजवळ एका युवकास मारहाण करण्यात आली. त्यानंतर काही क्षणातच छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गावर मोठा जमाव जमा झाला. या जमावाने महामार्गावरील ट्रक व इतर वाहनांवर दगडफेक केली. त्यानंतर तोफखाना पोलिसांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात झाला.
जिल्हा शासकीय रुग्णालयातही मोठा जमाव जमला होता. सुपा पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी रुग्णालयात जाऊन जमाव पांगवला. त्यानंतर काही वेळाने पत्रकार चौक रस्त्यावर जमावाने एकास मारहाण केली. या जमावाला आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.