लोणी काळभोर : किरकोळ भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर तिघांनी खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डनमध्ये रविवारी (ता.२५) मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तिघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित ऊर्फ पप्पु दत्तात्रय वाळुंजकर (वय २४ वर्षे हा विठ्ठल मंदिराचे पाठिमागे, पाषाणकर बाग, लोणी काळभोर) असे जखमी झालेल्या रियल इस्टेट व्यावसायिकाचे नाव आहे. तर सारंग काळभोर त्याचा भाऊ सौरभ काळभोर व मित्र दिपक क्षिरसागर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत, याप्रकरणी सुमितचा मामा गणेश विठ्ठल नगिने (वय ३२, धंदा- जिम व्यवसाय, रा. श्री साई समर्थ हाईट् रुम नं ३०५, पाषाणकर बाग, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, सुमित ऊर्फ पप्पु वाळुंजकर आणि आरोपी सारंग काळभोर यांच्यामध्ये रविवारी (ता.२५) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद झाले होते. त्यावेळी सारंग काळभोर याने सुमितला शिवीगाळ करून “थांब तुला संध्याकाळपर्यंत दाखवितो.” अशी धमकी दिली.
रविवारी (ता.२५) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सारंग काळभोर याने सुमितला फोन करुन, श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डनमध्ये बोलावुन घेतले. सुमित तेथे पोहचला. तेव्हा तेथे सारंग काळभोरचा भाऊ सौरभ काळभोर व मित्र दिपक क्षिरसागर उपस्थित होते. सारंगने सुमितला दुपारी झालेल्या भांडणावरुन पुन्हा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी सुमित याने त्यास शिवीगाळ करु नको असे बोलला. तेव्हा सारंग व दिपक यांनी सुमितला हाताने मारहाण केली. तर सारंग काळभोरचा भाऊ सौरभ काळभोर म्हणाला तुझा खेळच खल्लास करुन टाकतो.” असे बोलून धारदार चाकु सुमितच्या पोटात भोकसला. चाकु भोकसल्यामुळे सुमितच्या पोटातून रक्त येत असल्याचे पाहुन, आरोपी तेथून फसार झाले.
दरम्यान, सारंगची आई शोभा यांचा गणेश नगिने यांना रविवारी (ता.२५) मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास फोन आला. आणि “लवकर घराचे जवळ ये पप्पुला कोणीतरी मारले आहे.” असे सांगितले. त्यानंतर मी तात्काळ सदर ठिकाणी पोहचलो असता. श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डनचे गेटसमोर सुमित ऊर्फ पप्पु हा निपचीत पडलेला दिसून आला.
त्यानंतर मी सुमितला उपचाराकरिता शेवाळवाडी येथील लोटस हॉस्पीटल येथे घेवुन गेलो. त्यानंतर लोणीकाळभोर येथील विश्वराज हॉस्पीटल सिटीस्कॅन केल्यानंतर सुमितला पुढील उपचारकामी ससून रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. सुमितला दवाखान्यात घेवुन जात असताना विचारणा केली असता, त्याने वरील आरोपींनी मारहाण केल्याची माहिती गणेश नगिने यांना दिली आहे. सध्यासुमित याच्यावर ससून रुग्णालयात अंतर रुग्ण म्हणुन उपचार चालु असुन, तो सद्या बोलण्याचे स्थितीत नाही.
याप्रकरणी सुमितचे मामा गणेश नगिने यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी सारंग काळभोर त्याचा भाऊ सौरभ काळभोर व मित्र दिपक क्षिरसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी, पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करित आहेत.