Pimpri Crime News : पिंपरी-चिंचवड : आठ जणांच्या टोळक्याकडून एका कामगारावर खुनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळे निलख येथून समोर आला आहे. आम्ही या भागातले भाई आहोत, असे म्हणत दहशत निर्माण करत टोळक्याने दुकानातील रोख रक्कम चोरून नेली व वाहनांची तोडफोड केली. हा प्रकार बुधवारी (ता. ०८) सायंकाळी पाच वाजता जीत एग्स सप्लायर्स या दुकानात घडला.
सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
स्वप्नील अच्युतराव गायकवाड (वय 24, रा. पिंपळे निलख) असे जखमी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी समीर राजेंद्र इंगवले (वय 36, रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबा सैफन शेख (वय 29, रा. पिंपळे गुरव), सोन्या क्षीरसागर, रामा हनुमंत कांबळे (वय 26, रा. बाणेर), अक्षय अहिवळे (रा. पिंपळे गुरव) आणि अन्य तीन ते चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे पिंपळे निलख येथे अंडी विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात काम करणारा कामगार अनिश मुरकुटे याचा भाऊ सौरव याचे अक्षय अहिवळे याच्या भावासोबत भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपी दुचाकीवरून फिर्यादी यांच्या दुकानासमोर आले. त्यांनी कामगार अनिश मुरकुटे याला हॉकी स्टिकने मारले. त्यानंतर तक्रारदार यांच्या गाडीवरील चालक स्वप्नील गायकवाड याच्या डोक्यात हॉकी स्टिक मारून खुनी हल्ला केला.
यामध्ये स्वप्नील गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी दुकानातील अंड्याचे ट्रे मधील अंडी फोडून नुकसान केले. दमदाटी करत आम्ही या भागातले भाई आहोत, असे म्हणत दशहत निर्माण केली तसेच दुकानाच्या काउंटर मधून ४८ हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. अनिश मुरकुटे याने आणलेल्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. आरोपींनी पळून जाताना आणखी एका दुकानदाराला मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Pimpari crime : आम्हाला पैसे दे नाहीतर तुला मारीन म्हणत तरुणाला लुटले, पिंपरीतील प्रकार