लोणी काळभोर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लै-गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्त मजुरी आणि १० हजार रुपये दंडाची ठोठाविली आहे. हे आदेश विशेष पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश के के जहागीरदार यांनी दिले आहेत.
हरिदास बाळासाहेब टकले (वय-३३, रा. चर्च शेजारी, पठारे वस्ती. कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हरिदास टकले याने एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून २०१६ साली पळवून नेले. आणि तिच्यासोबत जबरदस्तीने शाररीक संबंध ठेवले. याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपीच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसात पॉक्सो व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला त्वरित अटक केली होती.
सदर गुन्ह्याचा खटला हा पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष पॉक्सो न्यायालयात सुरु होता. सरकारी पक्षाच्या वतीने वकील अरुंधती ब्रम्हे यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला १० वर्षे सक्त मजुरी आणि १० हजार रुपये दंडाची ठोठाविली आहे. व दंड न भरल्यास १ वर्ष साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. हे आदेश न्यायाधीश के के जहागीरदार यांनी दिले आहेत.
दरम्यान, सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांना या खटल्यात लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान, महिला पोलिस हवालदार ललिता कानवडे, पोलिस नाईक संतोष सोनावणे आणि संदीप धुमाळ यांची मदत मिळाली.