पुणे : दुकान व चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेराहून पैसे आण असे म्हणून पतीने पत्नीचा छळ करताना ओढणीने गळा आवळून खून केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आलीअसून याप्रकणी पतीसह तीन जणांविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती प्रवीण काळूराम जाधव (वय-३०), सासरा काळूराम विठ्ठल जाधव, सासू प्रमिला काळूराम जाधव (सर्व रा. जाधववाडी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर श्वेता प्रवीण जाधव (वय-२७) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी श्वेताचे वडील सोमनाथ हरिभाऊ होले (रा. वानवडी, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार शनिवारी (ता.१८) उघडकीस आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता आणि प्रवीण यांचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. त्यांना पाच वर्षाचा एक मुलगा आहे. प्रवीण याचे जाधववाडी येथे किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानासाठी व चारचाकी गाडी घेण्यासाठी श्वेताने माहेरून पैसे आणावेत, यासाठी प्रवीण छळ करत होता.
प्रवीणने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. श्वेताचा ओढणीने गळा आवळला. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिला चक्कर आल्याचे सासरच्या मंडळींनी सांगितले. डॉक्टरांनी श्वेताला तपासून तिला मृत घोषीत केले.
शवविच्छेदन अहवालात श्वेताचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी असता सासरच्या मंडळींनी रचलेला खुनाचा बनाव उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी तीन जणांवर खूनाचा गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.