हडपसर : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या टोळीप्रमुखासह ५ जणांवर हडपसर पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी) अंतर्गत कारवाई केली आहे.
पंकज ऊर्फ पंक्या गोरख वाघमारे (टोळीप्रमुख) (वय-२४, रा. बंटर शाळेजवळ, गाडीतळ हडपसर), स्वप्निल ऊर्फ बिट्या संजय कुचेकर, (वय- २२, रा. मांजरी, ता. हवेली) राहुलसिंग रविंद्रसिंग भोंड (वय -१८, रा. केनॉल शेजारी, तुळजाभवानी वसाहत, हडपसर), आकाश ऊर्फ आक्या गोविंद शेंडगे, वय-२०, रा. के. के. घुले शाळे समोर, मांजरी बुद्रुक ता. हवेली) यांना अटक करण्यात आली आहे. तर एक विधीसंघर्षित बालक यास ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज ऊर्फ पंक्या गोरख वाघमारे याच्या टोळीने दहशत निर्माण करून गुन्हयांची शृंखला चालुच ठेवल्याचे व त्यातुनच ते स्वतःचा आर्थिक फायदा करून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्यांनी पुन्हा-पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.
या टोळीने ४ साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करुन २५ डिसेंबरला फिर्यादी यांचे घरात घुसुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांचे गळयाला चाकु लावुन, शिवीगाळ करत आवाज मत करो, नहीं तो जान से मार दूंगा, तुम्हारे पास जो कुछ हैं, वो चुपचाप निकाल के दे दो असे बोलून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
त्याबरोबर फिर्यादी यांचेकडील मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण १४ हजार ६५०रुपये किमतीचा ऐवज जबरी चोरी करुन घेऊन गेले होते. त्याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासा दरम्यान वरील ५ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी यांनी संघटितपणे दहशतीचे मार्गाने प्रस्तुत गुन्हा केला असल्याचे दिसुन आल्याने वेळोवेळी त्यांचेविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा ते कायदयास जुमानत नव्हते.
तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अन्वये हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी परिमंडळ ५ चे पोलीस उप-आयुक्त विक्रांत देशमुख, यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग रंजन शर्मा यांना सादर केला होता.
सदर प्रकरणाची छानणी करून पंकज ऊर्फ पंक्या गोरख वाघमारे व त्याचे साथीदार यांचे विरुद्ध या प्रस्तावाची पडताळणी करुन वरील टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग बजरंग देसाई हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, रंजन शर्मा, पोलीस उप-आयुक्त, परि-५ विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग बजरंग देसाई यांचे मार्गर्शनाखाली हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे, विश्वास डगळे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, बर्गे, पोलीस उप-निरीक्षक अविनाश शिंदे, हडपसर गुन्हे शोध पथक व निगराणी पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.