लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील “एमआयटी कॉर्नर” हा भाग महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या “फ्री स्टाईल” हाणामारीचा ओपन अड्डा बनला आहे. “एमआयटी कॉर्नर” या ठिकाणी मागील तीन महिन्याच्या काळात पाच ते सहा वेळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या “फ्री स्टाईल” हाणामाऱ्या झाल्याचे दिसून आले आहे. “फ्री स्टाईल” हाणामाऱ्या करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर मागील तीन महिन्याच्या काळात एकही मोठी पोलिसी कारवाई झाली नाही. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांच्या कारवाईकडे या भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मुबलक दारु, हवा तेवढा चरस-गांजा, धांगडधिंगा करण्यासाठी हॉटेल, सोबतीला महाविद्यालयीन ललना तर दुसरीकडे लोणी काळभोर पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळेच “एमआयटी कॉर्नर” या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या फ्री स्टाईल हाणामारीत वाढ झाल्याचा आरोप या भागातील स्थानिक नागरिकांनी केला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या फ्री स्टाईल हाणामारीला चाप लावण्याची मागणी या भागातील स्थानिक नागरिकांनी “पुणे प्राईम न्यूज”शी बोलताना केली आहे.
लोणी काळभोर येथील एमआयटी विद्यापीठामुळे कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील “एमआयटी कॉर्नर” परिसरात मागील काही वर्षापासून विद्यार्थ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या गर्दीमुळे कॉफी शॉप, वडापाव सेंटर व छोट्या-मोठ्या हॉटेलची संख्याही मोठ्या प्रमानात वाढली आहे. एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता, “एमआयटी कॉर्नर” परिसर रोज हजारो विद्यार्थ्यांनी फुलल्याचे दिसून येत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वावरामुळे “एमआयटी कॉर्नर” परिसरात रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. याचाच फायदा गैरधंदे करणाऱ्यांनी उचलण्यास सुरुवात केली आहे. “एमआयटी कॉर्नर” परिसरात गांजा, चरस, गुटखा या सारख्या नशिल्या पर्दार्थांची विक्री जोरात चालू आहे. तर दुसरीकडे मुबलक दारु व सोबतीला ललणा असल्याने, अनेक पैसेवाले विद्यार्थी राडा करत असल्याचे चित्र मागील काही महिन्यापासून दिसून येऊ लागले आहे.
पोलिसांकडून कारवाई मात्र नाहीच !
याबाबत अधिक माहिती देताना स्थानिक म्हणाले, एमआयटी विद्यापीठामधील हजारो विद्यार्थी सकाळ-संध्याकाळ बाहेर येत असल्याने या भागातील अर्थव्यवस्था चांगलीच फुगली आहे. मात्र, त्याचवेळी विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ पुरविणाऱ्या पंटरची संख्या व टपऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने, या भागात गांजा, चरससह सर्वच प्रकारचे अवैध धंदे फोफावले आहेत. “एमआयटी कॉर्नर” परिरातील काही हॉटेलमध्ये दारु मुबलक प्रमाणात तेही खास सवलतीच्या दरात मिळत असल्याने, या भागात नको त्या प्रवृत्तीही वाढू लागल्या आहेत. रात्री अकरानंतर हॉटेलसह सर्व प्रकारचे व्यवसाय करण्यास बंदी असूनही, या भागातील हॉटेल व ‘नको ते धंदे’ पहाटेपर्यंत चालु असल्याचे चित्र सर्रास दिसुन येत आहे. मागील तीन महिन्याच्या काळात लातूर बँकेच्या समोरील भागात पाच ते सहा वेळा मोठी “फ्री स्टाईल” हाणामारी झालेली आहे. मात्र, पोलिसांची कारवाई होत नसल्याने, हाणामारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. लोणी काळभोर पोलिसांनी यापुढील काळात तरी कठोर भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
“एमआयटी कॉर्नर”वर पोलिसांच्या तिसऱ्या नजरेची गरज
“एमआयटी कॉर्नर” परिसरात खाण्यापिण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी येणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींची संख्या मागील दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या भागात स्थानिक व एमआयटी शिक्षण संस्थेमधील आंबट शौकिन तरुणांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर दुसरीकडे अनेक गुन्हेगारही “एमआयटी कॉर्नर” परिसरात फिरत असल्याचे दिसून येत आहेत. तर दुसरीकडे रात्री ठराविक वेळेनंतर एमआयटी शिक्षण संस्थेच्या कॅम्पसमधून बाहेर पडण्यास बंदी असतानाही, एमआयटीच्या सुरक्षारक्षकांना मॅनेज करुन अनेक विद्यार्थी रात्री उशीरापर्यंत बाहेर राहत असल्याचे चित्र आहे. भविष्यातील मोठा गुन्हा टाळण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज आहे. तर पोलिसांनी रात्री अकरानंतर चालणाऱ्या सर्वच व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे.
हाणामारीबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू
याबाबत लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांची भेट घेण्यात आली. ते म्हणाले, “एमआयटी कॉर्नर” परिसरात होत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या “फ्री स्टाईल” हाणामारीबाबत माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. गुरुवारी (ता. 31) “एमआयटी कॉर्नर”ला झालेल्या हाणामारीतील आरोपींवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. यापुढील काळात “एमआयटी कॉर्नर” परिसरातील गैरप्रकार थांबविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहे. तसेच रात्री दहानंतर संबंधित ठिकाणी अचानक छापे टाकून, कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही पोलिसांना केल्या आहेत.