नवी दिल्ली : बला-त्कारातील पीडित तरुणीने सार्वजनिक ठिकाणी नराधमाच्या आईवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना भजनपुरा भागात शनिवारी (ता.७) संध्याकाळी घडली असून याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे.
या गोळीबारात खुर्शीदा (वय अंदाजे ५०, रा. गल्ली क्रमांक २०, सुभाष मोहल्ला, उत्तर धोंडा, दिल्ली) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना एका सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुर्शीदा या किराणा दुकान चालवतात. तर त्यांच्या मुलाने सन २०२१ बलात्कार केला होता. असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याचा राग मनात धरून बलात्कार पीडित तरुणीने आरोपीच्या आईवर गोळी झाडली.
या घटनेची माहिती मिळताच, दिल्ली पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेले शस्त्रही पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे.