मुंबई : डिजिटल युगाच्या या दुनियेत गेल्या काही काळापासून सायबर गुन्ह्यात प्रचंड वाढ झाली आहे. सामान्य नागरिकांना टार्गेट करत सायबर गुन्हेगार त्यांच्या पैशांवर डल्ला टाकत आहेत. नुकतेच 2000 कोटी रुपयांचे सायबर चोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक देखील केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
श्रीगंगानगर पोलिसांनी सायबर चोरीत पडलेल्या आरोपी कृष्ण शर्माने देशभरातील हजारो लोकांना शिकार बनवत त्यांच्याकडून 99 कोटी 65 लाख लुबाडले आहेत. नागरिकांना खोट्या गुंतवणूक योजना, क्रिप्टो ट्रेडिंग आणि बनावट लकी ड्रॉजच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. या रॅकेटमधील आरोपी व्हॉट्सॲप कॉल, सोशल मीडियाच्या जाहिराती, फेक वेबसाईट्स वापरून लोकांना झटपट पैसे कमवण्याचं आमिष दाखवायचे. आणि सामान्य लोकांकडून पैसे उकळायचे. अनेक वेळा ते बँक कर्मचाऱ्यांच्या, पोलीस किंवा तपास यंत्रणेच्या नावाने लोकांना धमकावून देखील पैसे घेत होते.

पोलिसांना या टोळीची माहिती मिळाली असता “सायबर शील्ड” मोहिमेअंतर्गत पोलिसांनी याचा शोध सुरु केला. या प्रकरणात पोलीस 75 हून अधिक बँक खात्यांवर लक्ष ठेवून होते. पोलिसांना या खात्यांमध्ये 51.81 कोटी रुपयांची संशयास्पद आर्थिक उलाढाल आढळून आली. या खात्यांशी संबंधित 20 पेक्षा अधिक राज्यांतून तक्रारी देखील आल्या होत्या. अशातच पोलिसांनी सापळा टाकत खारडा गावातून कृष्ण शर्माला अटक केली. पोलिसांनी त्याच्या बँक खात्याची तपासणी केली तेव्हा पोलिसांना बँक खात्यात तब्बल 99 कोटी 65 लाख रुपयांची उलाढाल झाल्याचं आढळून आलं. या रॅकेटने कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये लोकांना गंडा घातला होता.







