पुणे : पुण्यातील लोहगावमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. हा प्रकार ४ जानेवारी रोजी लोहगाव येथे घडला आहे. व्यवसायासाठी माहेरहून पैसे घेऊन यावे यासाठी आणि चारित्र्याच्या संशयातून सासरचे लोक विवाहितेचा छळ करत होते. गौरी राजेंद्र खंडागळे (वय ३५, रा. आंबोलीता, ता. खेड) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी पती राजेंद्र बारकू खंडागळे, सासू कुसूम बारकू खंडागळे, दीर नितीन खंडागळे, रेखा नितीन खंडागळे, शोभा शिंदे (सर्व रा. आंबोलीता, ता. खेड, पुणे) यांच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गौरी हिचे वडील विठ्ठल पवार (वय ६५, रा. केळडे, ता. भोर) यांनी बुधवारी १७ जानेवारीला फिर्याद दिली आहे.
गौरी खंडागळे आणि राजेंद्र खंडागळे यांचे २०१३ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर पाच वर्षांनी आरोपींनी संगनमत करून गौरीचा छळ करण्यास सुरुवात केली. व्यवसायासाठी तुझ्या आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये, अशी मागणी आरोपींनी वारंवार केली. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण देखील केली. आरोपींच्या त्रासाला कंटाळून गौरी हिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वारंगुळे करत आहेत.