पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील अटक असलेल्या सर्व बँक अधिकारी व सहआरोपी यांनाही जामीन मंजूर झाला आहे. पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात मागील २१ महिन्यांपासून मंगलदास बांदल कारागृहात होते.
याबाबत शिक्रापूर येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मांढरे यांनी २१ एप्रिल २०२१ रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन मंगलदास बांदल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने गुन्हे घडल्याच्या तक्रारीवरुन बांदलांसह त्यांच्या जवळचे मित्र व काही बँक अधिकाऱ्यांना अटक झाली होती. त्यानंतर अशाच पद्धतीचे बांदल यांच्याशी संबंधित तक्रारी दाखल झाल्या होत्या. बांदल यांच्यावर एकूण पाच गुन्हे दाखल झाले होते.
याप्रकरणी बुधवारी (ता.१८) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात बांदल यांच्यासह त्यांच्यासोबत अटकेत असणाऱ्या सर्वांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला, अशी माहिती अॅड. आदित्य सासवडे यांनी दिली. बांदल यांच्या वतीने उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील अशोक मुंदर्गी, अॅड. आबाद पोंडा, अॅड. अनिकेत उज्ज्वल निकम, अॅड. तपन थत्ते व अॅड.आदित्य सासवडे यांनी कामकाज पाहिले.जामीन प्रक्रियेला आणखी चार ते पाच दिवस लागतील. यानंतरच बांदल आणि इतर बाहेर येतील अशी माहिती अॅड. अदित्य सासवडे यांनी दिली.